आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

माजी आमदार दिलीप माने शिवसेनेच्या वाटेवर

लोकसत्ता लोगो लोकसत्ता 24-08-2019
© IE Online Media Services Pvt Ltd द्वारे प्रदान केलेले

समर्थकांच्या मेळाव्यात काँग्रेसला सोडचिठ्ठीचे संकेत

सोलापूर जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसला लागलेली घरघर अजूनही सुरूच असून करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांच्या पाठोपाठ सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हेही लवकरच शिवसेनेत दाखल होत आहेत. समर्थकांच्या मेळाव्यात स्वत: माने यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेशाचे संकेत दिले. सोलापूर दक्षिण मतदारसंघात मोठी राजकीय ताकद असलेल्या माने यांचे दोन खासगी साखर कारखाने आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील दिवंगत माजी आमदार ब्रह्मदेव माने यांचे चिरंजीव असलेले दिलीप माने यांनी आपल्या समर्थकांची बैठक ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेच्या सभागृहात घेतली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी आपण काँग्रेसमध्ये राहू नये, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर सदैव अन्यायच केला आहे. म्हणून काँग्रेस पक्षात राहायचे नाही, असा आग्रह समर्थकांनी धरला असता तो मोडता येणार नाही, असे दिलीप माने यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर माने हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र त्याबाबतचा अधिकृत निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाणार असल्याचे स्वत: माने यांनी सांगितले.

स्वत:चे दोन साखर कारखाने, अभियांत्रिकी महाविद्यालय व शिक्षण संस्था, सहकारी बँक अशा विविध संस्था ताब्यात असलेले दिलीप माने हे २००९ साली सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही त्यांनी ताब्यात घेतली होती. त्यापूर्वी २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष लढत दिली होती.

अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे व पंढरपूरचे आमदार भारत भालके हे दोघेही काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला ऊत आला असताना आता याच पक्षाचे स्थानिक वजनदार नेते दिलीप माने यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसची स्थिती दयनीय झाली आहे.

More from Loksatta

image beaconimage beaconimage beacon