आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

भ्रष्टाचार, दहशतवादाला आळा घालण्यात अभूतपूर्व यश – मोदी

लोकसत्ता लोगो लोकसत्ता 23-08-2019
© IE Online Media Services Pvt Ltd द्वारे प्रदान केलेले

लोकसभा निवडणुकीत भाजपला नवभारताच्या उभारणीसाठी जनादेश मिळाला असून आमच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार, वशिलेबाजी, लोकांच्या पैशांची लूट, दहशतवाद या सर्व बाबींना कधी नव्हे एवढा आळा घालण्यात यश आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतीय जनसमुदायापुढे बोलताना सांगितले.

युनेस्को मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी यांनी  तिहेरी तलाकवर घातलेल्या बंदीसह  दुसऱ्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख केला.

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना त्यांनी सांगितले,की अस्थायी गोष्टींना भारतात स्थान नाही. महात्मा गांधी, गौतम बुद्ध, राम, कृष्ण यांच्या भूमीला जे अस्थायी होते ते काढून टाकण्यास ७० वर्षे लागली, यावर हसावे की रडावे समजत नाही. सुधारणा, कामगिरी व स्थित्यंतर यातूनच देश वेगवेगळी उद्दिष्टे गाठू शकेल.

मोदी हे तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समध्ये आले आहेत. भारत केवळ मोदींमुळे पुढे चाललेला नाही, तर मतदारांनी दिलेल्या जनादेशामुळे प्रगती करीत आहे,असे त्यांनी सांगताच गर्दीतून ‘मोदी है तो मुमकीन है’च्या घोषणा देण्यात आल्या.  नवभारतात भ्रष्टाचार, वशिलेबाजी, घराणेशाही, लोकांच्या पैशाची लूट व दहशतवाद याला कधी नव्हे इतका लगाम बसला असल्याचा दावा त्यांनी केला.

काँग्रेस नेते व माजी मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केल्याचा संदर्भ त्यांच्या वक्तव्यास होता. विरोधकांनी मात्र यात राजकीय सूडाचा भाग असल्याचे म्हटले होते.

तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले,की नव भारतात मुस्लीम महिलांवरचा अन्याय सहन केला जाऊ शकत नाही. स्पष्ट धोरण व योग्य दिशा यामुळे सरकार एकामागोमाग एक ठोस निर्णय घेऊ शकले. भारत हा आता आशा व आकांक्षांच्या दिशेने प्रवास करीत असून १३० कोटी लोकांचे प्रयत्न त्यात आहेत. देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळेच लोकांनी आम्हाला पुन्हा जनादेश दिला. हा जनादेश  केवळ सरकार चालवण्यासाठी नव्हता, तर संपन्न संस्कृती असलेल्या नवभारतासाठी होता. नवभारत हा उद्योगस्नेही आणि जीवनस्नेही (जगण्यास सोपेपणा) असणारा आहे. अजून १०० दिवसांचा टप्पा यायचा आहे, पण ५०-७५ दिवसांत आम्ही अनेक गोष्टींचे नियोजन केले. काही गोष्टी पूर्ण झाल्या, काही होणे बाकी आहे.  सीओपी २१ हवामान परिषदेतील उद्दिष्टे २०३० पर्यंत भारत पूर्ण करील. पाच वर्षे आधीच २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त होईल, असे ते म्हणाले.

फ्रान्समध्ये १९५० व १९६० या वर्षांत झालेल्या दोन भारतीय हवाई अपघातांतील मृतांच्या स्मारकाचे अनावरण त्यांनी केले.  सरकारने विकासापासून लोकांच्या सक्षमीकरणापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन त्यांनी सांगितले, की जगातील मोठी आरोग्य विमा योजना व जनधन बँक खाती योजना  राबवण्यात आली. गेल्या पाच वर्षांत देशातील अनेक वाईट प्रथा बंद करण्यात आल्या. गरीब शेतकरी व व्यापाऱ्यांना पेन्शन, जलशक्ती मंत्रालयाची स्थापना, तिहेरी तलाकला विराम हे निर्णय घेण्यात आले. गेल्या साठ वर्षांत संसदेचे आताचे अधिवेशन सर्वात फलदायी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतानेच नव्हे,तर फ्रान्सनेही फॅसिझम व दहशतवादाचा मुकाबला  केला आहे. हवामान बदल, दहशतवाद या धोक्यांना दोन्ही देशांनी सहकार्याने तोंड दिले आहे. भारत व फ्रान्स या दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार करून नवा आदर्श घालून दिला आहे.     – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

More from Loksatta

image beaconimage beaconimage beacon