आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

‘खर्चिक’ कुस्ती प्रशिक्षकाला हटवले

महाराष्ट्र टाइम्स लोगो महाराष्ट्र टाइम्स 03-10-2019
© Times Internet Limited द्वारे प्रदान केलेले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय कुस्ती फेडरेशननने गुरुवारी भारतीय संघाचे प्रशिक्षक हुसेन करिमी यांना पदावरून काढून टाकले आहे. त्यांच्या नियुक्तीच्या अवघ्या सहा महिन्यांत फेडरेशनला हा निर्णय का बरे घ्यावा लागला असेल, असा प्रश्न इथे पडल्यावाचून राहणार नाही. तर याचे कारणही तसे भुवया उंचावणारे आहे. करिमी यांची महागडी जीवनशैली भारतीय मल्लविद्येला साजेशी नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. करिमी यांचा करार पुढील वर्षी रंगणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत होता; पण बुधवारीच त्यांच्या हाती काढून टाकण्यात आल्याची नोटीस सोपवण्यात आली.

'करिमी यांची जीवनशैलीच अतिमहत्त्वाच्या लोकांसारखी (व्हीआयपी) आहे. दिवसागणिक त्यांच्या मागण्या वाढतच होत्या, ज्यांची पूर्तता करणे कठीण होऊन बसत होते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला आम्ही याविषयी सांगितले असून त्यांना पदावरून काढून टाकत नव्या प्रशिक्षकाचा शोधही सुरू झाला आहे', असे भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहाय्यक चिटणीस विनोद तोमर यांनी सांगितले.

आवाजवी मागण्या...

करिमी यांच्या अशा कोणत्या मागण्या होत्या, ज्यांची पूर्तता करणे कठीण जात होते? या प्रश्नावर तोमर स्पष्ट करतात की, 'भारतीय संघातील मल्लच काय; पण इतर सहाय्यक प्रशिक्षकांशी समन्वय साधणे करिमी यांना जमलेच नाही. ते नेहमीच मल्लांबाबत कोणती न कोणती तक्रार आणि नव्या मागणीसह हजर व्हायचे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात राहणे त्यांना रुचत नसे. त्यासाठी आम्हाला संकुलानजीक एक घर भाड्याने घ्यावे लागले. त्या घरापासून संकुलात जाण्यासाठी त्यांना कायम गाडीची सोय लागे'. 'शिबिरादरम्यान किंवा स्पर्धांदरम्यान नेहमीच प्रशिक्षक आणि खेळाडू राहण्याची खोली शेअर करतात; पण करिमी यांना स्पर्धांदरम्यानही स्वतंत्र खोली लागत असे. अलीकडेच नूर-सुलतान येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यानही खेळाडू व प्रशिक्षकांनी रुम शेअर करण्याची सूचना होती; पण तिथेही करिमी यांनी स्वतंत्र रूमची मागणी केली. त्यांच्या अशा मागण्या डोईजड होऊन बसल्या होत्या', असे भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहचिटणीस विनोद तोमर यांनी सांगितले.

पठ्ठ्यांचा घामाचीही अडचण

करिमी यांना महिना ३५०० डॉलर पगार होता; पण त्यांच्या अतिरिक्त मागण्यांची पूर्तता करता, करता भारतीय कुस्ती फेडरेशनला महिन्याला पाच हजार डॉलर्सचा खर्च होत होते. मात्र यासपेक्षाही चिंतेची बाब होती ती म्हणजे करिमी यांच्यावर विश्वास ठेवणेच कठीण जात होते. आपला शब्द ते पाळत नसत. 'स्पर्धेदरम्यान आपण सगळेच बघतो की प्रशिक्षक आपल्या पठ्ठ्यांचा घाम टिपतात; पण करिमी यांना तेदेखील आवडत नव्हते. याच कारणास्तव करिमी हे मल्लांना सरावादरम्यान नवे डावपेच शिकवण्यासाठीही पुढाकार घेत नसत. घामाळलेल्या मल्लांना आपण हात लावणार नाही, असे ते सांगत', असे तोमर म्हणाले.

करिमींचे म्हणणे

दरम्यान आपली बाजू मांडताना करिमी म्हणाले की, 'कुस्ती बहरेल, असे प्रशासनच भारतात नाही. इथे फक्त अडचणी आहेत. बघा आता त्यांनी माझा करारच रद्द केला आहे'. अलीकडेच नूर-सुलतान येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये भारताने चार पदके पटकावली. तसेच तीन ऑलिम्पिक प्रवेशही मिळवले. असे म्हटले जाते की, सोनीपत येथील बहालगढ येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरात आपल्याच पद्धतीने सराव व्हावा, याबाबत करिमी आग्रही होते. मात्र भारताचे एलिट मल्ल स्वतःच सराव करतात. बजरंग पुनिया हा जॉर्जियाच्या शाको बेंतिनिडिस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो, तर सुशीलकुमार रशियाच्या कमाल मलिकोव्ह यांच्याकडून प्रशिक्षण घेतो. यंदाच्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा दीपक पुनिया आणि ब्राँझपदक विजेता रवी दाहिया हे दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमचे पठ्ठे आहेत.

आधीच जुळवाजूळव

नूर-सुलतान येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यानच भारतीय कुस्ती फेडरेशनने उझ्बेकिस्तान आणि रशियाच्या प्रशिक्षकांशी संवाद साधत भविष्याची तजविज करून ठेवली आहे. तसेच ज्यांना भारतीय कुस्तीच्या प्रशिक्षकपदात स्वारस्य आहे, त्यांना अर्ज करण्यासही सांगण्यात आले होते. येत्या १ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय शिबिराला सुरुवात होत असून त्याआधी प्रशिक्षकाची निवड होण्याची शक्यता आहे.

More from Maharashtra Times

महाराष्ट्र टाइम्स
महाराष्ट्र टाइम्स
image beaconimage beaconimage beacon