आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

NBAचं मराठी कनेक्शन: मुंबईकर विवेक रणदिवेंची ग्लोबल भरारी

BBC मराठी लोगो BBC मराठी 06-10-2019
विवेक रणदिवे © Getty Images विवेक रणदिवे

NBA म्हणजेच 'नॅशनल बास्केटबॉल लीग' या जगप्रसिद्ध बास्केटबॉल स्पर्धेतील दोन संघ मुंबईत प्रदर्शनीय सामने खेळले गेले. वरळीच्या NSCI मधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये रंगलेला हा मुकाबला पाहण्यासाठी तमाम भारतीय सेलेब्रिटींनी हजेरी लावली आणि त्यामुळे त्याचा सोशल मीडियावरही चांगला ट्रेंड राहिला.

मात्र अनेकांना कळेना की नेमकं चाललंय काय! कारण क्रिकेटवेड्या भारतात बास्केटबॉलचं प्रस्थ नाही. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळांच्या दुनियेत अमेरिकेत रंगणाऱ्या 'NBA' स्पर्धेचं महत्त्व प्रचंड आहे.

National Basketball Associationचं NBA हे आद्याक्षर आहे. भारतात जशी इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धा होते तशीच NBA ही बास्केटबॉलची व्यावसायिक लीग आहे.

तर मुंबईत इंडियाना पेसर्स आणि सॅक्रामेंटो किंग्स या दोन क्लब्समध्ये हे दोन प्रदर्शनीय सामने खेळले गेले. हाऊसफुल्ल तिकीटविक्री झालेल्या या दोन्ही सामन्यांद्वारे भारतात बास्केटबॉलला चालना मिळेल, ही आशा केली जात आहे.

मात्र या महाआयोजनाचं एक मराठमोळं कनेक्शनसुद्धा आहे. सॅक्रामेंटो किंग्स या संघाचे मालक आहेत मूळ मुंबईचे विवेक रणदिवे.

जुहू भागात लहानाचे मोठे झालेले विवेक यांना क्रिकेट खेळायला मनापासून आवडायचं. सुनील गावस्कर हे त्यांचे आवडते क्रिकेटर.

विवेक रणदिवे (निळ्या जर्सीत) © Getty Images विवेक रणदिवे (निळ्या जर्सीत)

अभ्यासात हुशार असणाऱ्या विवेक यांना अपोलो 11 चंद्रयानाचं रेडिओ वृत्तांकन फारच भावलं. मग त्यांनी 1975मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय झाला. मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी (MIT) या संस्थेतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून MBA केलं.

वॉल स्ट्रीटचं डिजिटायझेशन करण्यात टिबकोचा मोठा वाटा होता. © Getty Images वॉल स्ट्रीटचं डिजिटायझेशन करण्यात टिबकोचा मोठा वाटा होता.

त्यानंतर विवेक यांनी युनिक्स कंपनी सुरू केली. पुढच्या काही वर्षांमध्ये त्यांनी फोर्ड मोटर्स, लिंकबिट, फॉर्च्युन सिस्टम्स या कंपन्यांसाठी काम केलं. 1985 मध्ये त्यांनी टेक्नेक्रॉन सॉफ्टवेअर सिस्टम्स नावाची कंपनी सुरू केली.

रिअल टाईम डेटाचा उपयोग करून घेत वॉल स्ट्रीटला डिजिटलाईज करण्याच्या प्रक्रियेचा ते अविभाज्य भाग होते. त्यांच्या या तंत्रज्ञानामुळे शेअर बाजाराची काम करण्याची पद्धत अमूलाग्रपणे बदलली.

विवेक यांनी 1997मध्ये TIBCO कंपनीची स्थापना केली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात इंटिग्रेशन, अॅनालिटिक्स आणि प्रोसेसिंग अशा आघाड्यांवर कंपनी काम करते. टिबको कंपनीने तयार केलेल्या सॉफ्टवेअर्सचा वापर अॅमेझॉन, ईबे यांच्यासह अमेरिकेच्या होमलँड सेक्युरिटीमध्ये होतो.

2015 मध्ये विवेक यांनी टिबको कंपनी चार अब्ज डॉलर्सला विकली. सॉफ्टवेअरनंतर विवेक यांनी बास्केटबॉल क्षेत्रातच मुशाफिरी करण्याचा निर्णय घेतला.

विवेक रणदिवे आपल्या सॅक्रमेंटो किंग्स संघाबरोबर © Twitter विवेक रणदिवे आपल्या सॅक्रमेंटो किंग्स संघाबरोबर

आर्थिक आघाडीवर नवनवी शिखरं सर करणाऱ्या विवेक 2013 मध्ये सॅक्रामेंटो किंग्स संघाचे सहमालक झाले. भारतीय व्यक्तीने NBA स्पर्धेतील संघाची मालकी मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

त्याआधी त्यांनी 'गोल्डन स्टेट वॉरियर्स' संघाची सहमालकी सोडून दिली. मात्र हा अनुभव त्यांच्या उपयोगी पडला. 'गोल्डन स्टेट वॉरियर्स' संघाचे मालक असताना बॉलिवूड नाईटचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात भारतीय खाद्य, कपडे तसंच संगीत यांची झलक मांडण्यात आली होती. 'Got Curry?' असं लिहिलेले टीशर्ट प्रिंट करून घेण्यात आले होते.

क्रिकेटवेडया देशात लहानाचे मोठे झालेल्या विवेक यांना बास्केटबॉलची आवड त्यांच्या मुलीमुळे लागली. ती शाळेत असताना बास्केटबॉल संघाचा भाग होती. त्यावेळी विवेक यांनी मुलींच्या संघाला मार्गदर्शन केलं होतं. तेव्हा बास्केटबॉलशी ऋणानुबंध जुळले ते कायमचेच.

गेटवे ऑफ इंडियाला NBAच्या थीमची रोषणाई करण्यात आली होती. © Getty Images गेटवे ऑफ इंडियाला NBAच्या थीमची रोषणाई करण्यात आली होती.

बास्केटबॉल भारतात अजून प्राथमिक पातळीवर लोकप्रिय असलं तरी येत्या काळात लोकप्रियता वाढेल असं विवेक यांना वाटतं.

NBAविषयी सारंकाही

NBA कधी सुरू झालं आणि त्याचं स्वरूप कसं आहे?

Basketball Association of America या नावाने 6 जून 1946 रोजी या लीगची स्थापना झाली. त्याच्या तीन वर्षांनंतर या लीगला NBA हे नाव मिळालं. या स्पर्धेत 30 क्लब्स म्हणजे संघ सहभागी होतात. ऑक्टोबर ते एप्रिल असा एनबीएचा हंगाम असतो. प्रत्येक हंगामात 82 सामने होतात.

सॅक्रमेंटो किंग्स © Getty Images सॅक्रमेंटो किंग्स

NBAला मान्यता आहे का?

NBA हे USA बास्केटबॉलशी संलग्न असून सक्रिय आहे. USA बास्केटबॉल हे FIBA अर्थात इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशनशी संलग्न आहे.

NBA स्पर्धेच्या मॅचेस कुठे पाहता येतात?

NBA जगभर प्रसिद्ध असून, 200 विविध देशांमध्ये या स्पर्धेच्या सामन्यांचं प्रसारण होतं. इंटरनेटवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही NBAचे सामने पाहता येतात.

एनबीएने 2011 मध्ये भारतात त्यांचं कार्यालय उघडलं. © Getty Images एनबीएने 2011 मध्ये भारतात त्यांचं कार्यालय उघडलं.

NBAचं आर्थिक महत्त्व काय?

पैशाच्या बाबतीत, जगभरात होणाऱ्या विविध लीगमध्ये NBA तिसऱ्या क्रमांकावर आहे. नॅशनल फुटबॉल लीग पहिल्या तर मेजर लीग बेसबॉल दुसऱ्या क्रमांक्रावर आहे. NBA स्पर्धेतील एका संघाची किंमत 1.9 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड आहे.

NBAची भुरळ डोनाल्ड ट्रंप यांनाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 'हाऊडी मोदी' या ह्यूस्टन येथील कार्यक्रमात मुंबईत होणार असलेल्या NBA मॅचेसविषयी विचारणा केली. "भारतात लवकरच एनबीएच्या मॅचेस होणार आहेत. मला मॅचेस बघण्यासाठी निमंत्रित आहे का?" असं त्यांनी हसतहसत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलं.

एनबीएची भारतात रुजवात कधी?

एनबीएने 2011 मध्ये मुंबईत कार्यालय उघडलं तर नॉयडात अकादमी सुरू केली. 14 ते 17 वयोगटातील 24 मुलांना इथे प्रशिक्षणाची संधी मिळते.

जगात केवळ सात ठिकाणी NBA अकादमी आहेत. टॅलेंट सर्चच्या माध्यमातून अकादमीसाठी खेळाडूंची निवड केली जाते. निवड झालेल्या मुलांना 100 टक्के स्कॉलरशिप मिळते. या मुलांना अमेरिकेत तसंच अन्य देशात होणाऱ्या स्पर्धा, सराव शिबीरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

NBAने याकरिता रिलायन्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे.

हे वाचलंत का?

https://www.youtube.com/watch?v=jGXdW3GMh0Q

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

More from BBC News|मराठी

BBC मराठी
BBC मराठी
image beaconimage beaconimage beacon