आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

उद्धव ठाकरे यांचा आयुष्यभर वैचारिक स्वैराचार! आशीष शेलार यांची परखड टीका

लोकसत्ता लोगो लोकसत्ता 25-01-2023 लोकसत्ता टीम
(संग्रहित छायाचित्र) © लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभर वैचारिक स्वैराचार केला. ज्यांना आपला पक्ष, कुटुंब, नेते सांभाळता आले नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर २०१९ मध्ये मते मिळविली, त्यांना भाजपबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी परखड टीका मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी केली.

‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी, आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपची तयारी, भाजपचा मुंबईच्या विकासासाठीचा दृष्टिकोन, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना, भाजप-शिवसेना युतीतील ताणतणाव, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात भाजपचे त्यांच्याशी असलेले संबंध आदी राजकीय विषयांबरोबरच मुंबईतील रात्रजीवन, लिव्ह इन रिलेशनशिप यासह अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. पंतप्रधान मोदी असले तरी महाराष्ट्रात मते मिळविण्यासाठी भाजपला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव लागते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेचे वर्तन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना यात जमीनअस्मानाचा फरक असल्याचा भाजपचा अनुभव असल्याचे सांगितले. बाळासाहेब दिलदार होते, त्यांच्याशी संवाद होत होता आणि हिंदूत्वासाठी आमची युती होती.

उद्धव ठाकरे यांचा स्वभाव मात्र अहंकारी असून ‘भाजपबरोबर युतीत शिवसेना २५ वर्षे सडली, असेही म्हणाले, महापालिकेत आणि २०१४ मध्ये युती एका जागेसाठी तोडली आणि पुन्हा आमच्याबरोबर सत्तेतही सहभागी झाले,’ असा त्यांच्या वागण्या-बोलण्याचे काहीच तारतम्य नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत महापौर भाजपचाच होईल, अशी ग्वाही देत शेलार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर युतीने लढून १५०हून अधिक जागा मिळविण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केले असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपकडून पुढे राहणार असून सत्ता मिळाल्यावर पुढील पाच वर्षांत आठ लाख कोटी रुपयांची कामे करून दाखवू, असा निर्धार शेलार यांनी व्यक्त केला. ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा बाळासाहेबांच्या शिवसेनेची कामगिरी निवडणुकीत अधिक वरचढ होईल, असा विश्वास व्यक्त करीत उद्धव ठाकरे यांनी गेल्या २५ वर्षांत पूर्ण केलेला मुंबईकरांसाठीचा एकतरी प्रकल्प सांगावा, असे आव्हानही शेलार यांनी दिले.

पंतप्रधानांवर जनतेचा विश्वास

देश हुकूमशाहीकडे चालला आहे, या विरोधकांच्या टीकेला कोणताही अर्थ नसून भाजपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही आहे, असे सांगून शेलार म्हणाले, पंतप्रधान मोदींवर जनतेचा विश्वास असून त्यांना भरभरून पाठिंबा मिळतो. त्यामुळे मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महापालिका निवडणुकीत भाजपचा चेहरा राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईचा कायापालट करण्यासाठी सहा महिन्यांच्या काळात अनेक निर्णय गतीने घेतले असून त्यांचा पक्षही वाढत आहे. मात्र ठाकरे गटाने महापालिकेत सत्ता असूनही एकही काम किंवा प्रकल्प पूर्णत्वास नेला नाही. केवळ भ्रष्टाचार केला. त्यांचे अर्धवट किंवा हाती न घेतलेले प्रकल्प आवश्यक मंजुऱ्या आणि निधी मिळवून आम्ही कामे सुरू केली आहेत. मुदतठेवींमध्ये ८० हजार कोटी रुपये असताना त्यांनी काही केले नाही. मात्र सत्ता आल्यावर आम्ही त्या जोरावर आठ लाख कोटी रुपयांची कामे करून दाखवू.

अजून रंग भरायचे आहेत

उद्धव ठाकरे यांची ‘किंचित सेना’ हीच प्रमुख प्रतिस्पर्धी असून आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही. मात्र निवडणूक तयारीच्या दृष्टीने अजून काही रंग भरायचे शिल्लक असून ते हळूहळू भरले जातील. सर्व रणनीती आम्ही आत्ताच उघड करणार नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले. मनसेबरोबर भाजप युती करणार का, असे विचारता ‘त्याबाबत काहीच ठरले नसून सध्या अशा चर्चा मनसेवरही अन्याय करणाऱ्या आहेत,’ असे शेलार यांनी सांगितले.

* मुंबईत सरसकट रात्रजीवन सुरू करण्यास भाजपचा विरोध

* रहिवाशांना त्रास न होता रोजगाराभिमुख व्यवसाय रात्रीही सुरू ठेवण्यास पाठिंबा

* मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर मीही त्यातून प्रवास करणार

* उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महापालिकेत दरोडा घातला ं

More from Loksatta

image beaconimage beaconimage beacon